दुष्काळ मुक्ती योद्धा संपतराव देशमुख (अण्णा) एक प्रवास

दुष्काळ मुक्ती योद्धा संपतराव देशमुख (अण्णा) एक प्रवास
आज टेंभू उपसा जलसिंचन व ताकारी पाणी योजनेमुळे कडेगाव खानापूर तासगाव, आटपाडी, माण, खटाव, सांगोला या कायम दुष्काळी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी पोहेचले, मातीने कात टाकली शिवार हिरवीकंच झाली, मळे डोलू लागले. ही किमया घडविण्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत कार्यरत टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार, दुष्काळग्रस्तांचे आधारस्तंभ, लोकनेते संपतरावजी देशमुख (अण्णा) यांचे आज पुण्यस्मरण त्यानिमित्त….
जि ल्ह्यातील खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी तालुक्याच्या पाचविला पूजल्यासारखा दुष्काळ असायचा. सलग १९७०, ७१ व ७२ या तीन वर्षात अवर्षणग्रस्त स्थिती होती. दुष्काळी परिस्थितीने गंभीर रुप धारण केले होते. यातच एक तरुण दुष्काळी कामावर लोकांची विचारपूस करीत होता. अडचणीवर मार्ग काढत लोकांना थोरल्या भावाप्रमाणे आधार देत होता. कोण होता हा तरुण… हे तर कडेपूरचे वकील अण्णा! म्हणजेच ॲड. संपतराव व्यंकटराव देशमुख. दुष्काळी परिस्थितीत संपतराव अण्णांनी प्रचंड काम केले. कुटुंबातील थोरला भाऊ या नात्यानं मदत केले. दुष्काळ जवळून पाहिला व दुष्काळ मुक्ती हे त्यांच्या जगण्याचे ध्येय झाले.संपतराव देशमुख याचा जन्म ४ एप्रिल १९३८ रोजी व्यंकटराव देशमुख यांचे जमीनदार घराण्यामध्ये झाला. मुंबई गव्हर्न्मेंट लॉ कॉलेजमधून एल.एल.बी. झाले. कराड न्यायालयात फौजदारी वकील म्हणून काम केले. त्यांची वकिली अतिशय उत्तम चालत होती. १९७९ च्या जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत संपतराव देशमुख निवडून आले व त्यांच्या वैधानिक राजकारणाला सुरवात झाली. त्यांची पंचायत समिती विटाचे सभापती व त्यानंतर सांगली जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापतीपदी भूषविले. खरेतर याच काळात अण्णांची कारकिर्द रंगली, बहरली, कामाचा प्रचंड उरक, कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक यामुळे अण्णा लोकप्रिय झाले. जि.प.चा अर्थसंकल्प सलग पाच वर्षे मांडला. अतिशय नेटका आणि विकासाभिमुख अर्थसंकल्प कसा असावा याचा उत्तम आदर्श त्यांनी ठेवला. अत्यंत मुरब्बी व सुसंस्कृत नेतृत्व म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. अण्णांनी संधी मिळताच कोल्हापूर पद्धतीचा बंधारे, पाझर, तलाव यांच्यासह रोजगार हमीचे कामे ताकतीने केली. नंतर पडलेल्या दुष्काळात चारा छावणी उभा करण्याकामी पुढाकार घेतला. प्रसंगी त्यांनी चारा छावण्या सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला. आमच्याकडे नेतृत्वाचा दुष्काळ कधीच नव्हता तर दुष्काळाशी समर्थपणे दोन हात करणाऱ्या योध्दा व शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्याची तळमळ असणाऱ्या नेतृत्वाची वानवा होती. ती भरुन निघाली. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत. भिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढविली व अण्णा आमदार झाले. अण्णांनी अपक्ष आमदारांचे नेतृत्व केले. त्यांना युती शासनाच्या काळात मंत्रीमंडळात येण्यासाठी निमंत्रण दिले होते परंतू मंत्रीपद नाकारुन मतदारसंघातील दुष्काळ संपविण्यासाठी पाणी योजना पूर्ण करण्यासाठी युती शासनाला पाठिंबा दिला.
२० ऑक्टोंबर १९९५ रोजी खंबाळे (औंध) (ता. कडेगांव) येथे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याहस्ते शेतकरी मजूर कष्टकरी याच्या सर्वांगीण विकासाची मुहूर्तमेढ रोवली व टेंभू उपसा जलसिंचन योजनेचा प्रारंभ झाला. तसेच ताकारी पाणी योजनेला गती देवून ती पूर्ण करण्याचा ध्यास घेतला होता. दुष्काळ मुक्ती योद्धा संपतराव देशमुख यांचे १६ मे ९६ रोजी पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये ह्रदय विकाराने अण्णांचे निधन झाले.