जालना घटनेच्या निषेधार्थ उद्या मंगळवारी कडेगाव तालुका बंद मराठा क्रांती मोर्चाची हाक : प्रांताधिकारी कार्यालयावर निघणार मोर्चा
जालना घटनेच्या निषेधार्थ उद्या मंगळवारी कडेगाव तालुका बंद
मराठा क्रांती मोर्चाची हाक : प्रांताधिकारी कार्यालयावर निघणार मोर्चा
कडेगाव : लोकभावना न्युज
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कडेगाव शहर व तालुक्यात मंगळवारी (०५ सप्टेंबर) रोजी बंदची हाक देण्यात आली आहे व सकाळी १० वाजता कडेगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
जालना येथील घटनेनंतर सोमवारी सकल मराठा समाजाची आणि मराठा क्रांती मोर्चाची कडेगाव येथे बैठक झाली. या बैठकीत मंगळवारी कडेगाव शहर व तालुका बंदचा निर्णय घेण्यात आला होता. या बंदला सर्व राजकीय पक्षांनी देखील पाठिंबा दिला आहे.
या बैठकीत मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने तालुका बंदची हाक देण्यात आली . त्यामुळे कडेगाव शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी कडकडीत बंद पाहायला मिळणार आहेत. तर या बंदमध्ये सहभागी होऊन जिल्ह्यातील व्यापारी आणि व्यवसायकांनी सहकार्य करण्याचे आव्हान सकल मराठा समाजाकडून करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन निघणार मोर्चा :
मंगळवारी सकाळी कडेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधव एकत्र येणार आहेत.तेथून निषेध मोर्चा निघणार आहे. कडेगाव येथील प्रांताधिकारी कार्यालय येथे हा मोर्चा जाणार आहे.जालना येथील घटनेच्या निषेधार्थ प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.