जिल्ह्यात गांजा सारख्या पिकाची लागवड होऊ नये याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

जिल्ह्यात गांजा सारख्या पिकाची लागवड होऊ नये याची दक्षता घ्यावी
– जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली दि. १० (जि.मा.का.) :- जिल्ह्यात यंदा खरीपाची पेरणी कमी झाली असल्याने जिल्ह्याच्या काही दुर्गम भागात गांजा सारख्या पिकाची लागवड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी कृषी, महसूल आणि पोलीस विभागाने याबाबत अधिक दक्ष राहून जिल्ह्यातील प्रत्येक गावातील पीक पेऱ्याची माहिती घ्यावी. जिल्ह्यात गांजा सारख्या पिकाची लागवड होऊ नये याची दक्षता घ्यावी. या कामी ग्रामस्तरीय यंत्रणेची मदत घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली नार्को समन्वय केंद्र, एनकॉर्ड समितीची बैठक झाली. बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्यासहा संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री होवू नये यासाठी संबधित विभागांनी नेहमी सतर्क राहून तपासणी मोहीम राबवाव्यात. यासाठी सीमावर्ती भागात आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. जत, उमदी, संख या भागात पोलीस पाटील यांच्या बैठका घेऊन याबाबत त्यांना माहिती देण्यात यावी.
अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यातील किरकोळ व घाऊक औषध विक्री करणाऱ्या मेडिकलमधून अंमली पदार्थ विक्री होऊ नये यासाठी मेडिकल दुकानांची तपासणी करावी. पोलीस, आरटीओ विभागाने जिल्ह्यात अंमली पदार्थ वाहतूक होऊ नये यासाठी विशेष पथके करून तपासणी करावी. तसेच माध्यमिक शिक्षण विभागाने याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. विद्यार्थ्यांना व्यसनाची सवय लागू नये यासाठी प्रसंगी त्यांच्या शाळेच्या दप्तराची शिक्षकांमार्फत तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.
००००००