ताकारी व टेंभूयोजनांच्या लाभक्षेत्रातील तलाव भरून द्यावेत कडेगावात जिल्हाधिकारी यांना निवेदन : डॉ.जितेश कदम यांच्यासह शिष्टमंडळाने घेतली भेट

ताकारी व टेंभूयोजनांच्या लाभक्षेत्रातील तलाव भरून द्यावेत कडेगावात जिल्हाधिकारी यांना निवेदन : डॉ.जितेश कदम यांच्यासह शिष्टमंडळाने घेतली भेट
♦
कडेगाव : ताकारी व टेंभू योजनांच्या लाभक्षेत्रात पाऊस अत्यंत कमी प्रमाणात झाला आहे.जमिनीतील पाण्याची पातळी फार खोल गेली आहे. विहिरीत पाणी नसल्यामुळे पिके वाळू लागली आहेत.शेतकरी शेतीला पाणी नसल्यामुळे फारच अडचणीत आहेत. यावर उपाययोजना म्हणून ताकारी व टेंभू योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करून लाभक्षेत्रातील तलाव तात्काळ भरून घ्यावेत अशी मागणी कडेगाव येथे काँग्रेसचे युवा नेते डॉ.जितेश कदम यांच्यासह कडेगाव तालुक्यातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. मंताडा राजा दयानिधी यांच्याकडे केली. जिल्हाधिकारी डॉ. मंताडा राजा दयानिधी हे कडेगाव तालुका दौऱ्यावर आले होते.यावेळी काँग्रेसचे युवा नेते डॉ.जितेश कदम यांच्यासह कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कडेगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयात त्यांची भेट घेतली.यावेळी कडेगाव तालुक्यातील पाणीप्रश्नावर मार्ग काढण्यासाठी ताकारी व टेंभू योजनांचे आवर्तन तात्काळ सुरू करण्याच्या मागणीबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ.जितेश कदम म्हणाले कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे व समाधानकारक पाऊस होत आहे.धरणात एकूण ३०टीएमसी झाला आहे.यामुळे ताकारी व टेंभू योजना सुरू करण्यात कोणतीही नैसर्गिक आणि तांत्रिक अडचण नाही.दोन्ही योजनांच्या लाभक्षेत्रातील बहुतांशी सर्व तलावातील पाण्याची पातळी खालावली असून या तलावांमध्ये मृत पाणीसाठा शिल्लक राहीला आहे.यामुळे आता आवर्तन सुरू करून दोन्ही योजनांच्या लाभक्षेत्रातील तलाव भरून घेणे गरजेचे आहे. ताकारी योजनेसाठी कृष्णा नदीतून दरवर्षी ९.३४ टीएमसी पाणी उचलण्याची परवानगी आहे.प्रत्यक्षात मात्र चार आवर्तनात ४.८ टीएमसी पाणी उचलले आहे.टेंभू योजनेसाठी दरवर्षी २२ टीएमसी पाणी उचलण्याची परवानगी आहे.प्रत्यक्षात मात्र जवळपास १२ टीएमसी पाणी उचलले आहे. ताकारी व टेंभू योजनांच्या वाट्याचे एकंदरीत १४ ते १५ टीएमसी पाणी कर्नाटक राज्यात वाहून जाते. आता कृष्णा नदीतूनही मोठया प्रमाणावर पाणी वाहून जात आहे. हे पाणी उचलून ताकारी व टेंभू योजनांच्या लाभक्षेत्रातील तलावांमध्ये सोडावे अशी मागणी डॉ.जितेश कदम यांनी केली. यावेळी प्रकाश जाधव ,सुनील जगदाळे,विजय मोहिते,महेश कदम, सुरेश मोहिते,तडसर उपसरपंच सुरज पवार ,आनंदराव मोरे,विठ्ठल मुळीक,राजेंद्र पवार, रुतुराज पाटील आदी उपस्थित होते .