ऊस दराची कोंडी ग्रीन पॉवर शुगर्सने फोडली, २८०१ रु दर जाहीर! स्वाभिमानी व कारखान्याच्या बैठकित निर्णय!

खटाव तालुक्यातील ऊस दराची कोंडी ग्रीन पॉवर शुगर्सने फोडली, २८०१ रु दर जाहीर!
स्वाभिमानी व कारखान्याच्या बैठकित निर्णय!
कडेगांव प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊसतोड बंद आंदोलन खटाव तालुक्यात सुरु होते, आंदोलन तीव्र स्वरूपात व्हायला सुरवात झाली होती, मात्र उसदराच्या चर्चेसाठी सोमवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व ग्रीन पॉवर शुगर्सचे मुख्य प्रवर्तक संग्रामभाऊ देशमूख यांच्यात झालेल्या समन्वय बैठकीत २८०१ रुपये दर सर्वानुमते जाहीर करण्यात आला, व खटाव तालुक्यातील उपस्थित शेतकऱ्यांनी हात उंचावून पसंती दर्शविली.
कारखाना कार्यस्थळावर झालेल्या बैठकीत मुख्य प्रवर्तक संग्रामसिंह देशमूख, जनरल मॅनेजर हणमंतराव जाधव,संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिहाध्यक्ष तानाजी देशमुख, खटाव तालुका अध्यक्ष दत्तूकाका घार्गे, सूर्यभान जाधव, सचिन पवार, प्रमोद देवकर,वैभव पाटील, अजय पाटील, सत्यवान मोहिते, संतोष तुपे, पांडुरंग सूर्यवंशी, जालिंदर जाधव,बंडा पाटील, पृथ्वीराज घार्गे, विनोद खराडे,विनोद घार्गे, धनाजी घार्गे,पपू मोहिते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना संग्रामसिंह देशमूख म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन पाऊले मागे घेण्याची आमची कायम तयारी आहे, गत हंगामातील शंभर रुपये व चालू हंगामात २८०१ दर देण्याचे आपल्या सर्वांच्या साथीने व साक्षीने ग्रीनं पॉवर देण्याचे कबूल करीत आहेत, आजपर्यंत शेतकऱ्यांनी जो विश्वास दाखविला आहे तो जपण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमूख म्हणाले की, ग्रीन पॉवर शुगर्सने आजपर्यंत वजनकाट्यात जो शेतकऱ्यांचा विश्वास कमावला आहे तो फार लाख मोलाचा आहे, अनेकदा आम्ही स्वतः खात्री केली आहॆ की ऊस बाहेरून वजन करून पुन्हा ग्रीन पॉवरच्या काट्यावर वजन केले असता एका किलोचा सुद्धा फरक आढळून आला नाही, त्यामुळेच ग्रीन पॉवरला ऊस कधी कमी पडत नाही.
दरम्यान जेष्ठ शेतकऱ्यांनी संग्रामसिंह देशमूख यांचा सर्वात अगोदर दर जाहीर केल्याबद्दल व कारखान्याचा काटा हा चोख असल्याबद्दल सत्कार केला.यावेळी स्वागत सूर्यभान जाधव यांनी प्रास्ताविक तालुकाध्यक्ष दत्तुकाका घार्गे यांनी केले तर आभार प्रमोद देवकर यांनी मानले.यावेळी खटाव तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.