कडेगाव तालुक्यातील ३६ गावे अद्याप ‘सिटीसर्व्हे ‘ नकाशा व उताऱ्यापासून वंचित
कडेगाव तालुक्यातील ३६ गावे अद्याप ‘सिटीसर्व्हे ‘ नकाशा व उताऱ्यापासून वंचित
गावागावात वादावादीचे प्रकार वाढू लागले : मोजणी करून उतारा देण्याची ग्रामस्थांची मागणी
कडेगाव :
कडेगाव तालुक्याची स्वतंत्र स्थापना होऊन सत्तरा ते अठरा वर्षे उलटून गेले तरी तालुक्यातील ५६ गावांपैकी ३६ गावांचे अद्यापही नगर भूमापन न झाल्याने सिटीसर्व्हे नकाशा व उताऱ्यांपासून त्यांना वंचित राहावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यांमुळे सध्या गावा -गावात अंतर्गत कलह वाढून वादावादीचे प्रकार वाढू लागले आहेत . यासाठी या मतदार संघाचे नेते कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ . विश्वजीत कदम यांनी विशेष लक्ष घालण्याची मागणी सध्या कडेगाव तालुक्यातील नागरिकांतून व्यक्त होत आहे . गेल्या काही वर्षांपासून कडेगाव तालुक्यातील काही गावांचे नगर भू मापन न झाल्याने या गावातील ग्रामस्थांना मोठ्या अडी-अडचणींचा सामना करावा लागत आहे . १९८५ पूर्वी २००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांची मोजणी करून त्या गांवांचा सिटीसर्व्हे नकाशा तयार करण्याचे काम सुरू होते . त्यांमुळे त्यावेळी तालुक्यातील ५६ गावापैकी २० गावेच २००० पेक्षा जास्त लोकसंख्येची असल्याने त्यांची मोजणी करून त्यांचा सिटीसर्व्हे नकाशा तयार करून त्यांचा प्रॉपटी उत्तारा तयार करण्यात आला होता. तसेच त्यांची कडेगाव भूमी अभिलेख कार्यालयातील दप्तरी तशी नोंद करण्यात आली आहे . परंतु त्यावेळी तालुक्यातील ३६ गावे ही २००० पेक्षा कमी लोकसंख्येची गावे असल्याने त्यांचा यामध्ये समावेश झाला नाही . तेव्हापासून ही गावे सिटीसर्व्हे नकाशा व उताऱ्यांपासून वंचितच राहिली आहेत . सिटीसर्व्हे न झाल्याने गावागावत दररोज शेजा-शेजाऱ्यांत तसेच भावा-भावांत वादावादीचे प्रकार वाढू लागले आहेत . त्यासाठी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष ,सरपंच , ग्रामपंचायत सदस्य ,पोलीस पाटील व गाव कारभाऱ्यांना दररोज हे प्रकरण मिटवावे लागत आहेत .तसेच या गावातील घरांची व खुल्या जागेची ग्रामपंचायत ८अ उतारा वगळता अन्य कोठेही नोद नसल्याने त्याचा या गावातील नागरीकांना त्रास होत आहे . तसेच सिटीसर्व्हे नकाशा व उतारा नसल्याने या गावातील नागरिकाना घर बांधणीसाठी कोणत्याच बँकेचे कर्ज मिळू शकत नाही . त्याचा फटका घर बांधण्याची गरज असणाऱ्या गावा -गावातील गोरगरीब शेतकरी व ग्रामस्थांना बसत आहे . त्यासाठी लवकरात – लवकर मोजणी करून त्यांचा सिटीसर्व्हे नकाशा तयार करण्याची मागणी गावा-गावातील सरपंच व ग्रामस्थांतून होत आहे . अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे .
सिटीसर्व्हे न झालेली गावे पुढीलप्रमाणे –
शिवाजीनगर ,नेर्ली ,सोनकिरे , आसद , उपाळे -मायणी , सोहोली , कुंभारगाव , शेळकबाव , शिरसगाव , सोनसळ , पाडळी ,निमसोड , कोतवडे ,खंबाळे -औंध , चिखली , अपशिंगे ,आंबेगाव , कान्हरवाडी ,तुपेवाडी ,कोतीज , ढाणेवाडी ,खेराडे -विटा ,भिकवडी -खुर्द ,तुपेवाडी , हणमंतवडिये ,येवलेवाडी , करांडेवाडी ,बोंबाळेवाडी , रायगाव ,उपाळे(वांगी) ,येडे ,सासपडे ,बेलवडे ,
रेणुशेवाडी शिरगांव ,वांगरेठरे