कडेगांव तालुक्यातील अवैद्य धंदे पूर्णता बंद करा अन्यथा आंदोलन -आकाश सातपुते
कडेगांव तालुक्यातील अवैद्य धंदे पूर्णता बंद करा अन्यथा आंदोलन -आकाश सातपुते
कडेगाव /प्रतिनिधी
कडेगांव,चिंचणी वांगी पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या गावांत खुलेआमपणे अवैध धंदे, यामध्ये, दारू, मटका, जुगार सुरू आहेत. या व्यवसायामध्ये प्रामुख्याने मटका या व्यवसायामुळे गोरगरिबांची घरे उद्वस्त झालेलीआहेत.सर्व अवैद्य धंदे तात्काळ कायमस्वरूपी बंद करावे. अन्यथा जनता क्रांती दल महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जनता क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आकाश सातपुते यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की दिवसभर केलेले कामाचे पैसे लोक मटका व्यवसायात घालवीत आहेत. मटका बुके हि गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडे आहे यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गरीब कामगार मजूर तसेच शेतकरी मुले या अवैद्य धंद्याच्या विळख्यात सापडून मोठ्या प्रमाणात गुन्हेगार क्षेत्राकडे वळलेली आहेत.अवैध धंद्याच्या विळक्यात अडकलेले लोक रोज कुटुंबातील महिलांना मारझोड करून घरातील पैसा मटका या व्यवसायावरती घालवित आहेत. लोक खाजगी अवैद्य सावकारांकडून मोठ्या व्याजदराने पैसे घेत आहेत, यातून कुटुंबीयांना सावकारांचा त्रास सुरू झाला आहे. या प्रकारामुळे अख्खी तरुण पिढी देशोधडीला लागली आहे. तात्काळ अवैध धंद्यावर कारवाई करून सर्व अवैद्य धंदे तात्काळ कायमस्वरूपी बंद करावे. अन्यथा जनता क्रांती दल महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सातपुते यांनी दिला आहे.