कडेगाव तालुक्यात १६ गावांमध्ये सापडल्या २ हजार २४ कुणबी नोंदी
कडेगाव तालुक्यात १६ गावांमध्ये सापडल्या २ हजार २४ कुणबी नोंदी
शोधमोहीम युद्धपातळीवर ; उर्वरीत गावांच्या नोंदी लवकरच होणार जाहीर
कडेगाव :
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सुरू केलेल्या कुणबी नोंद शोध मोहिमेत कडेगाव तालुक्यातील
जुन्या ४६ गावांपैकी १६ गावांची कुणबी नोंदीची शोधमोहीम पूर्ण झाली आहे.या १६ गावांमध्ये आत्तापर्यंत २ हजार २४ नोंदी सापडल्या आहेत. कोतवडे गावांत सर्वाधिक ३४५ नोंदी सापडल्या आहेत.उर्वरित 30
गावांची शोध मोहीम चालू असून या गावातील नोंदी लवकरच प्रसिद्ध होतील.
शासनाने मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदी शोधण्याचे काम हाती घेतले आहे.
कडेगाव तहसीलदार कार्यालयात कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष कक्ष सुरू केला आहे. याठिकाणी
मागील महिन्याभरापासून नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. यासाठी इतिहास,संस्कृती, पुरातत्व तथा
पुरालिपी अभ्यासक प्रख्यात मोडी लिपी तज्ञ अशोक नगरे यांची कडेगाव तहसीलदार कार्यालयाच्या वतीने नियुक्ती केली आहे. येथे अत्यंत नाजूक कागदपत्रे प्रसंगी भिंगाच्या सहाय्याने तपासून नोंदी शोधल्या जात आहेत. या कक्षामध्ये मोडी तज्ञ यांच्या मदतीसाठी आवश्यक कर्मचारी कार्यरत आहेत. कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीची नोंद असलेले अभिलेखे शोधण्यात येत आहेत.मोडी भाषेतील अभिलेखे असतील तर त्याचे भाषांतर करून ते प्रमाणित करण्यात येत आहेत. तालुकास्तरावरील तपासलेल्या अभिलेख्यांचे एकत्रीकरण करून त्याचे डीजीटायझेशन करून सर्व अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
कडेगाव तालुक्यातील गावनिहाय सापडलेल्या कुणबी
नोंदी पुढीलप्रमाणे : कडेगांव – १९ ,अपशिंगे – १६९ ,हिंगणगाव खुर्द – ५७, मोहिते वडगांव – २१,शिवणी – ८१ नेर्ली – २०३ ,कोतवडे – ३४५ , खंबाळे (औंध) – १९४ ,कडेपूर – १३ , येतगांव – २३ , कुंभारगांव – १४७ ,शाळगांव – १४६ , अंबक – ६० ,शेळकबाव – २४२, आसद – २२५ ,उपाळे वांगी – ७९ अशा १६ गावांमध्ये २०२४ नोंदी सापडल्या आहेत.उर्वरित ३० गावांच्या नोंदी गाव नमुना १४ जन्म-मृत्यू रजिस्टरमधून घेण्याचे काम अद्यापही सुरू आहे.
ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांनी आपली वंशावळ शोधण्यासाठी महसूली पुरावे जमा करावे लागतील. पात्र लोकांनी आवश्यक कागदपत्रे जमवून प्रकरणे सादर करावीत. अधिकाधीक पात्र लाभार्थ्यांनी प्रकरणे सादर करावीत, असे आवाहन अजित शेलार यांनी केले आहे.