ताज्या घडामोडी

अल्पसंख्याकांसाठीच्या योजना तळागाळातील व्यक्तिंपर्यंत पोहोचवा – महानगरपालिका आयुक्त सुनील पवार

अल्पसंख्याकांसाठीच्या योजना तळागाळातील व्यक्तिंपर्यंत पोहोचवा

Download Aadvaith Global APP

– महानगरपालिका आयुक्त सुनील पवार

 

  सांगली, दि. 18 (जि. मा. का.) : अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी त्यांच्यासाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजना तळागाळातील व्यक्तिंपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त सुनील पवार यांनी केले.

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त अल्पसंख्याकांना हक्काची जाणीव जागृती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, पोलीस उपअधीक्षक डी. बेन, अल्पसंख्याक विकास विभागाच्या माजी सहसचिव श्रीमती अैनुल आत्तार, तहसिलदार लीना खरात, महानगरपालिका उपायुक्त राहुल रोकडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे पॅनेल विधीज्ञ ॲड. मोहन कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते शाहीन शेख, डॉ. अजित पाटील, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे नोडल अधिकारी सलिम नदाफ, समाज कल्याण कार्यालयाचे लेखाधिकारी संजय कुलकर्णी, अधीक्षक प्रशांत मोहिते, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक कल्याणी दैठणकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्त सुनील पवार म्हणाले, अल्पसंख्याक समुदायांसाठी असणाऱ्या विविध योजनांबाबतच्या माहितीचे फलक महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये लावण्यात येतील. तसेच, महानगरपालिका निधीमध्येही तरतूद करू. मेळावे आयोजित करण्यासाठी प्रयत्न करू. या योजनांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त प्रस्ताव द्यावेत. अल्पसंख्याक समुदायातील मुलांसाठी गरज भासल्यास महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या शाळांमध्ये वसतिगृह सुरू करण्यासाठी प्रयत्न करू. स्पर्धा आयोजित करून त्यातील अव्वल खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी मानधन स्वरूपात मदत करण्यासाठी प्रयत्न करू. सर्व समाज एका स्तरावर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे सांगून श्री. पवार यांनी अल्पसंख्याक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

या वेळी श्रीमती अैनुल आत्तार यांनी अल्पसंख्याक समुदायांसाठी असणाऱ्या विविध योजना व शिष्यवृत्तींबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, अल्पसंख्याक समाजाची स्थिती, गती व प्रगती या विषयावर सामाजिक कार्यकर्ते शाहीन शेख, अल्पसंख्याक नागरिकांचे हक्क व त्यांच्या संरक्षणासाठीचे कायदे या विषयावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे पॅनेल विधीज्ञ ॲड. मोहन कुलकर्णी व अल्पसंख्याक समाजासाठी असणाऱ्या भारतीय संविधानातील तरतुदी व त्यांचे फायदे या विषयावर डॉ. अजित पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांनी अल्पसंख्याक समुदायाला त्यांचे हक्क, त्यांच्यासाठी असणाऱ्या विविध योजनांबाबत जनजागृती करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी नागरिकांनी त्यांच्या समस्या, अडीअडचणी, सूचना उपस्थित मान्यवरांसमोर मांडून त्या सोडविण्याबाबत ‍विनंती केली.

प्रास्ताविकात प्रा. आवळे यांनी कार्यक्रमाचा हेतू ‍विशद करून सविस्तर माहिती दिली. आभार मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे नोडल अधिकारी सलिम नदाफ यांनी मानले. कार्यक्रमास अल्पसंख्याक समुदायातील नागरिक उपस्थित होते. 

00000

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App