ताज्या घडामोडी

वंचित बहुजन समाजाला शिक्षणाचे दान देणारे दातृत्वान व्यक्तीमत्व म्हणजेच स्व. डॉ. पतंगरावजी कदमसाहेब

वंचित बहुजन समाजाला शिक्षणाचे दान देणारे दातृत्वान व्यक्तीमत्व म्हणजेच स्व. डॉ. पतंगरावजी कदमसाहेब

Download Aadvaith Global APP

 

सांगली जिल्ह्यातील सोनसळ येथे ८ जानेवारी १९४४ ला डॉ. पतंगराव कदम यांचा शेतकरी कुटुंबात झाला. साहेबांना सात भाऊ व दोन बहिणी असं मोठं कुटुंब होते. महाराष्ट्राच्या पवित्र जन्मभूमीत यशासारखे यशस्वी काहीच नसतंय डॉ. पतंगरावजी कदमसाहेब यांचे उत्तुंग यश भवितव्याची साक्ष देणारी ठरली.

साहेबांचे शिक्षण एम. ए. एल. एल. बी. पीएच डी एवढे झाले आहे. साहेबांनी शिक्षण, उद्योग, व्यापार, वाणिज्य आणि संसदीय कामकाज, सहकार, महसूल, मदत आणि पुनर्वसन, वनमंत्री ही पदे भूषवली तसेच एकवेळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते प्रभारी अध्यक्ष होते. काँग्रेसचे ज्येष्ठ आणि ताकदवान नेते म्हणून त्यांची ओळख होती.

डॉ. कदमसाहेब भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यापिठाचे संस्थापक आहेत. साहेबांची प्रशासनावर पकड आणि तातडीने निर्णय घेणारे नेते अशी ओळख होती. साहेब प्रेमळ मनाचे आणि दिलदार स्वभावाचे होते. साहेब मंत्री पदावर असताना, कोणत्याही पक्षाचा नेता कार्यकर्ता आला तरी त्याचे काम करणे, भेटायला आलेल्या सर्व लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन तात्काळ त्यांना मदत करणे, तातडीने निर्णय घेणे अशी त्यांची कामाची पद्धत होती.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत साहेबांनी शिक्षण पूर्ण केले. साहेब त्याकाळी मॅट्रिक म्हणजे दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेले गावातले पहिले विद्यार्थी होते. कदमसाहेब यांनी पुण्यात माध्यमिक शाळा अर्धवेळ शिक्षक म्हणून काम सुरु केले. त्यानंतर साहेबांनी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे संचालक म्हणून काम पाहिले.

साहेबांनी सांगलीसाठी स्वतंत्र विभाग सुरू केला. साहेबांनी बॅचलर पदवी प्राप्त केली. नंतर साहेबांनी पी.एच.डी. पूर्ण केली. डॉ पतंगराव कदमसाहेब यांनी १९६४ मध्ये भारती विद्यापीठाची स्थापना केली. नवी दिल्ली आणि दुबई येथे त्यांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि कॉम्प्युटर ॲप्लीकेशन यांची महाविद्यालये स्थापन केली आहेत. डॉ. कदमसाहेब हे भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटीचे संस्थापक असून ते याचे संस्थापक-कुलगुरु देखील आहेत. साहेबांनी देश विदेशात भारती विद्यापीठ शाळा आणि कॉलेजची स्थापना केली.

भारती विद्यापीठात ग्रामीण भागातील मुलं, आदिवासी, महिला आणि यासारख्या वंचित वर्गांना परवडणारे किंमतीत शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या. भारती विद्यापीठाने शिक्षणाच्या विविध क्षेत्रांत केलेल्या यशामुळे उत्तम कामगिरी नोंदवली आहे. साहेबांनी शिक्षण, उद्योग, महसूल आणि वन या सारख्या खात्यात त्यांनी भरीव कामगिरी केली. साहेबांच्या धाडसी निर्णयामुळे विविध क्षेत्रातील विकासाला नवी गती मिळाली. बुद्धीमतेला कल्पकतेचा, प्रज्ञेला प्रतिभेची, अभ्यासाला ध्येयाची आणि अथक परिश्रमाला प्रगतीची दिशा मिळते.

डॉ. पतंगरावजी कदमसाहेब यांनी शैक्षणिक परिषदा व चर्चासत्रे यामध्ये भाग घेण्यासाठी तसेच शैक्षणिक संस्थांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. अशा आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये त्यांनी आपले शोधनिबंध सादर केले आणि चर्चामध्ये भाग घेतला होता.

डॉ. पतंगराव कदम यांनी अमेरिका, कॅनडा, कोरिया, स्वीडन, थायलंड, दुबई अशा देशांना भेटी दिल्या होत्या. पुण्यातल्या हिंजेवाडीत आज मोठया दिमाखात उभं असलेलं आयटी पार्क डॉ. कदमसाहेब यांच्या दूरदृष्टीचं साक्षीदार आहे. राजकारणात सक्रिय सहभाग असतानाही त्यांनी शिक्षण काही सोडले नाही.

अनेक वेळा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत साहेबांचं नाव आघाडीवर असायचं, साहेबांना मात्र मुख्यमंत्रीपदाने अनेकवेळा हुलकावणी दिली. साहेब निराश कधीही झाले नाहीत. आपल्या पक्षाची आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहिले. साहेब अनेकवेळा सांगायचे हल्ली तत्त्वांशी विचाराशी एकमता ठामपणाची भूमिका असलेलं राजकारण आता राहिले नाही. व्यक्तीचा विकास, समाजाचा विकास आणि आपल्या देशाचा आपल्या मायभुमीचा विकास करणं आपलं कर्तव्य आहे.

डॉ. पतंगरावजी कदमसाहेब धाडसी निर्णय घेत होते. धाडस करणारा माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करीत नाही. डॉ. कदमसाहेब जीवनभर सर्व प्रसंगांना, संघर्षाला धाडसाने सामोरे गेले. शून्यातून विश्व निर्माण करणारे ते व्यक्तीमत्व होते.

महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिले. पश्चिम महाराष्ट्रातील ‘लोकनेता’ म्हणून साहेबांचा गौरव झाला. शब्द हाच अध्यादेश. डॉ. पतंगरावजी कदमसाहेब यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खाते होते. साहेबांना खात्याचा पूर्वानुभव जबरदस्त होता. राज्यात दुष्काळी स्थिती होती.

डॉ पतंगरावजी कदमसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली दर मंगळवारी उपसमितीची बैठक व्हायची. त्यात महत्त्वाचे निर्णय घेऊन डॉ पतंगरावजी कदमसाहेब बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर मांडायचे आणि तातडीने त्याला मंजुरी द्यायचे. सायंकाळी पाच वाजता अध्यादेश जारी झालेला असायचा. त्या काळात दहा लाख जनावरे ना. डॉ विश्वजीत कदमसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली छावणीत सांभाळली.

एकावेळी ५२०० टॅंकरने पाणीपुरवठा केला. याच काळात साखळी बंधाऱ्यांची योजना पुढे आली. ओढयावरील दीड हजार साखळी बंधारे बांधण्यात आले. डॉ पतंगराव कदम यांनी गरिबीत दिवस कंठण्यात समाधान न मानता शिक्षण घेतले आणि शिक्षकी पेशा स्वीकारला.

शिक्षकाची नोकरी सोडून देऊन त्यांनी भारती शिक्षण संस्था काढली. भारती विद्यापीठाला पुढे अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्याने ती संस्था भारती विद्यापीठ झाली. भारती विद्यापीठ म्हणजे एक साम्राज्य आहे. ग्रामीण भागातल्या हजारो विद्यार्थ्यांना स्वस्तात शिक्षणाची संधी देऊन चांगले जीवन प्राप्त करून दिले आहे.

पुण्यातील सदाशिव पेठ म्हणजे विद्वानांची खाण असे समजले जायचे. विद्वता ही विद्येच्या मायघरात सिद्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी भारती विद्यापीठाची सुरुवातही त्यांनी पुण्यातील सदाशिव पेठेतून सुरु केली. ‘माझ्या गावातला मॅट्रिक झालेला मी पहिला मुलगा होतो. पुण्यात आलो आणि जिथे एक खडा मारला, तर दहा विद्वानांना लागतो, अशा सदाशिव पेठेतल्या एका दहा बाय दहाच्या खोलीत विद्यापीठाची स्थापना केली. डॉ. पतंगराव कदम आपला परिचय करून देताना नेहमी अशीच सुरुवात करीत. विद्वत्ता ही फक्त पुणेकरांची मक्तेदारी नाही तर पुण्यात येऊन गावाकडचे लोकही काही करु शकतात हे साहेबांनी करुन दाखवले.

डॉ. कदमसाहेब यांचेही स्वप्न मुख्यमंत्री होणे हे होतेच पण त्यांचे ते स्वप्न सत्यात उतरले नाही. मात्र साहेबांनी आपले हे ध्येय कधी लपवून ठेवले नाही. साहेब अनेकदा आपली ओळख महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्हणून करीत असत. असे असले तरी मुख्यमंत्री होण्यास लागणाऱ्या गोष्टींची त्यांच्यात काही कमतरता नव्हती. राज्याचा गाडा हाकण्याची क्षमता त्यांच्यात निश्चितच होती पण त्यापायी करावे लागणारे राजकारण त्यांनी केले नाही.

कोणत्याही क्षेत्रात उतरल्यावर हाती घेतलेले काम हे सर्वोच्च शिखरावर न्यायचे हा त्यांचा ध्यास होता. त्यातूनच पश्चिम महाराष्ट्रातून भारती विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी एक साम्राज्य उभे केले.

एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या डॉ. पतंगराव कदमसाहेब यांनी राज्यच नव्हे, तर देशाच्या विविध भागांतही शिक्षणाचे अक्षरश: साम्राज्यच निर्माण केले. सोनसळसारख्या दुष्काळी व काहीशा दुर्गम परिसरात एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात डॉ पतंगराव कदमयांचा जन्म झाला. गावात कोणतीही शिक्षणाची सोय नसल्यामुळे प्राथमिक शाळेत जाण्यासाठी ते दररोज पाच किलोमीटरची पायपीट करीत त्यांनी कुंडल गावी वसतिगृहात मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्या गावातील ते पहिलेच मॅट्रिक. १९६१ मध्ये ते पुण्यात आले. रयतच्याच एका हायस्कूलमध्ये अर्धवेळ शिक्षक म्हणून नोकरी करतानाच त्यांनी तेव्हाच्या पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. गेल्या ५३ वर्षात संस्थेची प्राथमिक ते पदव्युत्तर; तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांतील अभ्यासक्रम शिकविणारी १८० शाळा-कॉलेजेस आहेत. त्यात तब्बल दीड लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून, सुमारे वीस हजार कर्मचारी नोकरीस आहेत.

त्यामध्ये दिल्ली आणि दुबईमध्येही त्यांनी कॉलेजांची स्थापना केली आहे. त्यांच्या या योगदानाची अनेक संघटनांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिले आहेत. लोकश्री, इन्स्टिटय़ूट ऑफ इकॉनॉमिक्स, नवी दिल्ली यांनी दिलेले, सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल मानवता सेवा अवॉर्ड, मराठा सेवा संघ यांनी शिक्षण क्षेत्रातील कामगिरीबद्दल मराठा विश्वभूषण पुरस्कार, आयएमएम, नवी दिल्लीतर्फे एक्सलन्स अ­ॅवॉर्ड इन एज्युकेशन, कोल्हापुरातील उद्योगभूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

भारती विद्यापीठासह या संस्था आणि विविध ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी हजारो गरीब कुटुंबे आणि विद्यार्थ्यांनाही भरीव मदत केली आहे. त्यामुळे रोजगाराभिमुख उद्योग उभारणीत आणि शिक्षणात साहेबांचे फार मोठे कार्य आहे. सर्वसामान्य समाजातील लोकांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून गोरगरीबांच्या आयुष्यात नवसंजीवन देऊन आज्ञाने आंधारलेल्या वंचित बहुजन समाजाला शिक्षणाचे दान देणारे दातृत्वान व्यक्तीमत्व म्हणजेच आदरणीय डॉ. पतंगरावजी कदमसाहेब यांच्या जयंतीनिमित्त साहेबांनी केलेल्या कार्याबद्दल विनम्र अभिवादन!!

साहेबांना कोटी कोटी प्रणाम धन्यवाद!!

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App