“मै आपके गाव जरूर आऊंगा” मोहिते वडगांवच्या श्रेयस ला राहुल गांधीचे आश्वासन

“मै आपके गाव जरूर आऊंगा” मोहिते वडगांवच्या श्रेयस ला राहुल गांधीचे आश्वासन
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समवेत भारत जोडो यात्रेत चालण्याची संधी मिळावी यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. हजारोंची गर्दी आणि कडक सुरक्षाव्यवस्था असल्याने ईच्छा असूनही कित्येक काँग्रेस पदाधिकारी, नेत्यांनाही राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही.पण मोहित्यांचे वडगांव येथिल श्रेयस मोहिते या युवा कार्यकर्त्याला थेट राहुल गांधी यांच्यासोबत चालण्याची, बोलण्याची,हातात हात देण्याची संधी मिळाली आहे.या भेटीची चर्चा सांगली जिल्यात सुरू आहे.
श्रेयस मोहिते हा मोहिते वडगाव येथील साध्या कुटुंबातील एका किराणा दुकानदाराचा मुलगा आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना NSUI या विद्यार्थी काँग्रेस संघटनेचा सदस्य झाला.आपल्या संघटनेतील कामाच्या बळावर आज तो या संघटनेचा सांगली जिल्हा उपाध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात देगलुर येथे आली तेव्हापासून श्रेयस या यात्रेत सहभागी झाला आहे.राहुल गांधी यांना भेटण्याचा मनात चंग बांधून तो यात्रेत सामील झाला.पण पहिले चार दिवस त्याला राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचता आले नाही.तरीही निराश न होता भेटीच्या आशेनं तो यात्रेत चालत राहिला.
पलूस कडेगांव चे स्थानिक आमदार माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचा यात्रेच्या नियोजनातील पुढाकार पाहून श्रेयसने त्यांना गाठले.त्यांना राहुल गांधी यांची भेट घालून देण्याची विनंती केली.अन् राहुल गांधी यांना भेटल्याशिवाय मी माघारी जाणार नाही असा दृढनिश्चय केल्याचं सांगितले.त्याचा निश्चय बघून विश्वजित कदम यांनाही नकार देता आला नाही.त्यांनी दुसऱ्या दिवशीचे राहुल गांधी यांचं नियोजन बघून त्यात पाच मिनिटे श्रेयस मोहिते यांना चालण्यासाठी वेळ मिळवून दिली.
सकाळी सहा वाजता चालायला सुरुवात केली.त्यांच्यासोबत डॉ.विश्वजित कदम काही काळ चालले त्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे श्रेयस मोहिते यांस आवाज दिला.बाळासाहेबांचा आवाज ऐकून श्रेयस पुढं सरकला. सुरक्षारक्षकांच्या गरड्यातून पुढं झाला,राहुल गांधी यांनी त्याचा हात हातात घेत विचारपूस केली.विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.अन् गावाचे नाव विचारले,मोहिते वडगांव नाव सांगताच *”नाम सूना हुवा लगता हैं म्हणत डिजीटल डिटॉक्स वाला गाव क्या??”* असे उत्सुकतेनं विचारले. गावातील digital Detox या उपक्रमाची माहिती घेतली.या उपक्रमाबद्दल संपूर्ण गावातील नागरिकांचे कौतुक केले.अन् भविष्यात सांगली दौऱ्यावर आल्यावर मोहिते वडगाव गावाला भेट देण्याचे आश्वासन दिले.शिवाय विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी यात्रेनंतर दिल्लीत वेळ घेवून भेटायला या,असे सांगितले.
राहुल गांधी हे प्रत्येकाला भेटणे शक्य नाही.मी ही एकवेळ आशा सोडून दिल्या होत्या पण आमचे नेते डॉ.विश्वजीत कदम यांच्यामुळेच हि अविस्मरणीय भेट घडली. या भेटीने काँग्रेस समर्थक,विदयार्थी काँग्रेस प्रतिनिधी,डॉ. विश्वजित कदम यांचा खंदा कार्यकर्ता म्हणून गेल्या सहा वर्षांत केलेल्या कामाचं चीज झालं असे श्रेयस सांगतो.
आजच्या भेटीने एक कार्यकर्ता म्हणून पक्षाचे नेते राहुल गांधीना भेटण्याचे बऱ्याच दिवसांचे स्वप्न साकार झाले.या भेटीचा आनंद शब्दात सांगण्यापलिकडचा असून हि अविस्मरणीय भेट भविष्यात काम करताना प्रेरणादायी ठरेल असा विश्वास श्रेयस मोहिते यांनी व्यक्त केला आहे.